नवी दिल्ली, - देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यावर भर दिली असून प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणारी यंत्रे, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही वॅमेरे यांसारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, अशी ग्वाही रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात दिली.
न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला १५ मेपर्यंत अॅफिडेव्हिट सादर करण्यास सांगितले असून त्यात रेल्वे स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना आणि भविष्याती तरतूदी याविषयी माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अँड कुश कालरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्यादृष्टीने उपकरणे बसविण्यात यावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल, आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.
रेल्वेच्यावतीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीत याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटल्याप्रमाणे यापूर्वीच सुरक्षेच्यादृष्टीने सर्व सुविधा रेल्वे स्थानकांवर पुरविण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले.