पोलीस डायरी 


1000 कोटींचा ड्रग्ज साठा 
तरुण पिढीचे होणार काय? 
सीमा शुल्क विभाग व महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय) रविवारी न्हावा शेवा बंदरात संयुक्त कारवाई करून तब्बल 191 किलो  अमली पदार्थांचा साठा जप्त केला. आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली हा अमली पदार्थांचा साठा अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात पाठविण्यात आल्याचे आढळून आले आहे. डीआरआयच्या पथकाने या कारवाईत औषध आयातीबाबतची कागदपत्रे बनविणाऱया दोन कस्टम एजंटांना व चार व्यापाऱयांना अटक केली आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे एक हजार कोटी रुपये इतकी किंमत आहे. आज जगातील बहुसंख्य पिढी ड्रगमाफियांनी पोखरली आहे. या व्यवसायात प्रचंड पैसा व नफा असल्याने अंडरवर्ल्डचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे. त्याची वाहतूक विमान व समुद्रमार्गे केली जाते. रेल्वे, बस व ट्रकने ड्रग्जचा नियोजित ठिकाणी पुरवठा केला जातो. 
एलएसडी, कोकेन, एमडीएमएसारखे महागडे अमली पदार्थ लॅटिन अमेरिका, युरोप व रशियासारख्या देशातून आपल्या देशात विमान व समुद्रमार्गे पाठविले जातात व त्याचे वाटप मुंबईतील जुहू, वांद्रे, अंधेरी, खार आदी उच्चभ्रू वस्तीमध्ये केले जाते. कोकेनच्या एका ग्रॅमची 5 ते 7 हजार रुपये किंमत असते, तर ‘एमडीएमए’सारख्या ड्रगला एका ग्रॅममागे सात ते आठ हजार रुपये मोजावे लागतात. हे सारे श्रीमंतांच्या पोरांचे चोचले आहेत. ऊर्जा वाढण्यासाठी सेलिब्रेटीही अशा महागडय़ा ड्रगचे सेवन करतात. 
गांजा, चरस, ब्राऊन शुगर व आता एमडीसारख्या अत्यंत जहरी अमली पदार्थानी मुंबईसह सारा देश पोखरला असून मुंबईतील रे रोड, मस्जिद बंदर, वरळी, सॅण्डहर्स्ट रोड, डोंगरी, माहीम, कुर्ला, गोवंडी, धारावी, मानखुर्द, अंधेरी, जुहू, शीव, पवई, मोहम्मद अली रोड, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, नवी मुंबईतील खारघर, ठाणे, कल्याण, मुंब्रा आदी परिसरात ड्रग्जमाफियांनी आपले जाळे पसरले असून चरस, गांजा, एमडी या कमी किमतीच्या अमली पदार्थापासून ते अगदी महागडय़ा कोकेन, एमडीएमए, एलएसडीसारख्या ड्रग्जचा पुरवठा रे रोड, गोवंडीपासून ते जुहू, वांद्रे, खार, अंधेरीसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये म्हणजे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत केला जात आहे. 
मध्य प्रदेशातील मंदसोर, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, नेपाळ, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी भागांतून मुंबईसह देशभरात ब्राऊन शुगर, हेरॉइन, गांजा आदी अमली पदार्थांचा पुरवठा ट्रक, ट्रेन, खासगी प्रवासी बसेस आदी वाहनांतून केला जातो. महाराष्ट्राच्या गडचिरोली, यवतमाळ, धुळे, धाराशीव आदी जिह्यांतूनही गांजाचे उत्पादन करून त्याचा पुरवठा मुंबईसह देशभरात केला जातो. डबघाईला आलेल्या कारखान्यात त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. पालघर, बोईसर, रायगड, महाड आदी औद्योगिक वसाहतींमध्ये दिवाळखोरीत निघालेल्या कारखान्यात अमली पदार्थांवर प्रक्रिया केली जाते. भाडय़ाने घेतलेल्या छोटय़ा छोटय़ा गाळय़ांमध्येही एमडी (शज्प्दहा) म्हणजे शदै शदै सारखे ड्रग्जचे उत्पादन केले जाते. सुरुवातीला या ड्रग्जची एका ग्रॅममागे 700 रुपये किंमत होती. आता त्याला  मध्यमवर्गापासून ते उच्चभ्रूंपर्यंत मोठय़ा प्रमाणात मागणी असून त्यासाठी एका ग्रॅममागे दोन हजारांच्या वर रुपये आकारले जातात. या ड्रग्जचे सध्याच्या तरुण पिढीला व्यसन जडले असून त्यावर नियंत्रण आणणे कठीण झाले आहे. अगदी शाळा-कॉलेजात या ड्रग्जने आपले हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जनहो सावधान! शाळा-कॉलेजात जाणाऱया आपल्या पोरांवर लक्ष ठेवा. एकदा का आपला पाल्य हातातून सटकला की त्याला कुणीही अगदी परमेश्वरही वाचवू शकत नाही इतकी एमडी, एलएसडीसारख्या ड्रग्जची भयानक नशा आहे. 
ग्रामीण भागात अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी आहे; परंतु या देशातील शहरी भागातील बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी अमली पदार्थांचे बळी ठरत आहेत. त्यात आता मुलींचीही संख्या वाढू लागली आहे. सुरुवातीला अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून किंवा जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे विद्यार्थी आज आपणास व्यसनाधीन झालेले आढळून येत आहेत. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान आदी देशांतून आपल्या देशात अमली पदार्थ येतात. नायजेरियन विद्यार्थी अमली पदार्थांच्या तस्करीत अधिक आहेत. त्यांनीही आपल्या देशातील सर्व शहरी भाग काबीज केले असून ड्रग्जतस्करीबरोबरच हे नायजेरियन बँक व एटीएम फ्रॉडमध्येही अधिक आहेत. पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणात अफूची शेती होत असल्याने पाकिस्तानने बाजूचाच आपला सारा पंजाब पोखरला आहे. लाखो पंजाबी तरुणांचे जीवन बरबाद केले आहे. पाकिस्तानचे हे एक छुपे युद्ध आहे. आपली तरुण पिढी जितकी व्यसनाधीन होईल, ड्रग्जच्या आहारी जाईल तितका हिंदुस्थान कमजोर होईल हे ध्यानात ठेवूनच पाकिस्तान आपल्या देशात विष पेरत आहे. 
एमडीसारख्या घातक ड्रग्जच्या आहारी गेलेला कोणताही तरुण-तरुणी किंवा विद्यार्थी अन्न खात नाही. त्यामुळे त्याचे वजन कमी होते. त्याच्या वर्तणुकीत बदल होतो, भूक लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते. फुप्फुसे व इतर अवयव निकामी होत जातात. ड्रग्जसाठी पैसे मिळाले नाहीत तर तो तरुण घरात व बाहेर चोऱया करतो. अशा प्रकारची ड्रग्ज ऑडिक्टची अनेक लक्षणे असून पालकांनी आपला मुलगा अमली पदार्थाच्या आहारी गेला आहे किंवा जाण्याच्या मार्गावर आहे असे लक्षात आल्यावर त्याच्याशी प्रेमाने बोलून त्यास परावृत्त केले पाहिजे. आपल्याकडे  व्यसनविरोधी व पुनर्वसन केंद्र चालविणाऱया ज्या खासगी व सरकारी संस्था आहेत त्यांची मदत घेऊन त्या मुलाला या संकटातून बाहेर काढले पाहिजे. रात्र वैऱयाची आहे. सारे शरीर पोखरणाऱया व मरणपंथाकडे नेणाऱया ‘ड्रग्ज’चे उच्चाटन करण्यासाठी आता प्रबोधन आवश्यक आहे. 
आपल्या देशात सर्वाधिक अमली पदार्थांचे बळी पंजाबात आहेत. तेथे आत्महत्यांचे प्रमाणही अधिक आहे; आता महाराष्ट्रातही अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी किमान एक हजार व्यसनाधीन तरुण-तरुणी महाराष्ट्रात आत्महत्या करीत आहेत. तेव्हा अमली पदार्थांचा हा विषारी साप, भस्मासुर जसा पंजाबच्या घराघरात पोहोचला आहे तसा तो उद्या मुंबईसह महाराष्ट्रात पोहोचायला वेळ लागणार नाही. तेव्हा जनहो सावधान! चुकूनही जिज्ञासेपोटी ‘ड्रग्ज’चे सेवन करू नका. आपल्या घरातील व जवळच्या विद्यार्थ्यांवर पालकांनी लक्ष ठेवावे. मुलाचे वागणे ऍबनॉर्मल, विचित्र वाटले तर तत्काळ उपचार सुरू करा आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करा.