धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णाचा आकडा ३९ वर

मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी कोरोनाच्या नवीन ६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे.


राज्यात सोमवारी सकाळी आढळलेल्या चार नवीन रुग्णांमध्ये तीन मुंबईतील आणि एक नवी मुंबईतील रुग्णाचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक कोरोनाचा रुग्ण आढळला. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात सध्या पिंपरी चिंचवडमध्ये - ९, पुणे- ७, मुंबई - ६, नागपूर - ४, यवतमाळ - ३, कल्याण - ३, नवी मुंबई - ३ आणि रायगड, ठाणे, अहमदनगर व औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील.