मुंबई : राज्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटया आकारमानाची ३०० ते ४०० चौरस फुटाच्या अत्यंत परवडणाऱ्या दरातील सदनिका नागरिकांना बांधून देण्याचा शासनाचा मानस आहे.
या सदनिका प्री-फॅब तंत्रज्ञानावर बांधल्यास परवडणाऱ्या दरात नागरिकांना सदनिका उपलब्ध करून देता येतील. यासाठी बांधकाम क्षेत्रातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वस्त दरातील गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवाव्यात, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
___'महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणा'च्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात अलीकडे झालेल्या आढावा बैठकीत आव्हाड यांनी या सूचना केल्या. राज्यातील घरांची वाढती मागणी आणि पुरवठा यातील वाढती तफावत लक्षात घेता गृहनिर्मितीच्या कामाला वेग देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करून आव्हाड यांनी, राज्यात प्रधान मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी सक्षमतेने करण्याचे आदेश दिले. म्हाडाच्या अखत्यारीत राज्यात उपलब्ध असलेल्या भूखंडांचा संपूर्ण तपशील आठवड्याभरात सादर करण्यासही त्यांनी सांगितले आहे.
१९६९ नंतरच्या उपकरप्राप्त इमारतींसंदर्भात धोरण ठरविण्याबाबत विकासकांबरोबर झालेल्या चर्चेत उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी मुंबईतील उपकरप्राप्त जमिनींचे मालक, भाडेकरू-रहिवाशी यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासानंतर म्हाडास प्राप्त होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या वितरणाबाबत धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.