मुंबई : गणित, विज्ञान अशा महत्त्वाच्या विषयांचा ताण दहावीच्या विद्यार्थ्यांना असतानाच आता करोनाच्या भीतीचीही भर पडली आहे. दहावीचे विद्यार्थी आणि पालक धास्तावले असून समुपदेशक, शाळांकडे पालकांनी धाव घेतली आहे.
करोनाची लागण राज्यातही झाल्याचे समोर आल्यामुळे त्याचा परिणाम आता नियमित कामकाजावर थोडाफार दिसू लागला आहे. सध्या राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू असून २३ मार्चपर्यंत परीक्षा परीक्षा झाली असून गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषयांची परीक्षा बाकी आहे. करोनाच्या भीतीने पालकांनी शाळा आणि शिक्षण विभागाकडे परीक्षांबाबत विचारणा सुरू केली आहे. अनेक राज्यांनी शाळांना सुट्टी दिली आहे. पुण्यातील तीन शाळाही चार दिवस बंद ठेवण्याचे शाळा प्रशासनाने जाहीर केले आहे. या सगळ्या वातावरणामुळे पालकांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. दहावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय शिक्षण मंडळानेही परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, टीपकागद, रुमाल घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सत्राबाबत मात्र केंद्रीय शिक्षण मंडळाने काहीच स्पष्ट केलेले नाही.
उपस्थिती रोडावली
मुळातच मुळातच तापमानातील सातत्याच्या चढउतारांमुळे सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याच्या कुरबुरी सुरू आहेत. त्यातच करोनाची भीती असल्यामुळे शाळांमधील नियमित उपस्थिती कमी झाली आहे, अशी माहिती एका मुख्याध्यापकांनी दिली. आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये अशी सूचना पालकांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक संघटना आणि पालकांनी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली आहे.