मुंबई, - होळी आणि धूलिवंदन दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात धडक कारवाई केली. चार दिवसांत राज्यात अवैध मद्य विक्रीचे ४४७ गुन्हे दाखल करून २८५ जणांना अटक केली.
होळीच्या अनुषंगाने राज्यात बनावट तसेच अवैध मद्य विक्रीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांनी राज्यात भरारी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. कारवाईकरिता पथक तयार केले. अवैध मद्य विक्रीचे प्रकार होतात त्या ठिकाणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सापळे रचून मद्य तस्करांच्या मुसक्या आवळल्या.७ ते १० मार्च या काळात उत्पादन शुल्क विभागाने राज्यात अवैध मद्य विक्रीचे ४४७ गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करून २८५ जणांना अटक केली. तर १ कोटी ११ लाख ९१ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल आणि २८ वाहने जप्त केल्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.