उलटा चस्मा तिरकी चाल !

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि बहुभाषिक शहर आहे, असे म्हणताना अनेकदा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इथली भाषा मराठी आहे, याचे विस्मरण घडते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन महाराष्ट्राने मुंबई जिंकली आहे, याचा विसर पडला तर तो त्या हुतात्म्यांचा अवमान ठरेल. परंतु आपल्याकडे मराठीचा अभिमान केवळ राजकारण करण्यापुरता आणि मराठी भाषा दिनाचे कर्मकांड पार पाडण्यापुरता मिरवला । जातो. बाकी व्यवहारातून मराठी हद्दपार होत आली. आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून पोट भरण्यासाठी येणाऱ्या कष्टकऱ्यांना मुंबई आपल्या पोटात सामावून घेत गेली आणि ते सामावून घेता घेता मुंबईचे मराठीपण हरवत चालले. मराठी माणसाची ही सहिष्णुता हीच खरी मराठी संस्कृती आहे. परंतु, ही संस्कृती आत्मसात करता करता मराठी माणूस आपली मूळ मराठी संस्कृती मात्र विसरत गेला. मग ती मराठी भाषा असो किंवा सण उत्सव. येत्या आठवड्यातच धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमी खेळून आपण उत्तर भारतीय संस्कृती किती आत्मसात केली आहे, हे मुंबई आणि परिसरातील मराठी लोक दाखवून देतील. या उदार सहिष्णुतेचाच गैरफायदा घेत काही समाजघटक आपली भाषा, संस्कृती या लादत गेले. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील संवादाच्या माध्यमातून जी वृत्ती समोर आली आहे, ती अशा सांस्कृतिक मुजोरीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. यासंबंधीची बातमी आली तेव्हाच, एक मोठे व सांस्कृतिक मराठी शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या डोंबिवलीत फक्त मराठी माणसांना प्रवेशबंदी असलेली क्रिकेटस्पर्धा आयोजित केल्याची बातमी येते. या दोन्ही घटना योगायोग म्हणून सोडून देता येणार नाहीत. मुंबईतील मराठी माणसांसंदर्भात, मराठी संस्कृतीसंदर्भात परप्रांतीय लोकांच्या काय धारणा आहेत, याचे प्रतिबिंब त्यातून दिसते. 'तारक मेहता..' ही दीर्घकाळ चाललेली लोकप्रिय मालिका आहे आणि प्रेक्षकांचा सरासरी बुद्ध्यांक आणि भावनांक लक्षात घेऊन ती चालवली जाते. त्यातील बाळबोधपणाला निरागसतेची जोड असल्यामुळे त्यातला आचरटपणा कधी कधी खपूनही जातो. परंतु जेव्हा या मालिकेत संवादाच्या माध्यमातून मुंबईच्या स्थानिक भाषेलाच आव्हान दिले जाते, तेव्हा त्यामागील तिरकी चाल समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. 'मुंबईची भाषा हिंदी आहे,' असे वाक्य संबंधित पात्राच्या तोंडी असते तर दुर्लक्ष करता आले असते आणि अनवधानाने घडलेली चूक म्हणून दुर्लक्ष करता आले असते. परंतु 'गोकुलधाम मुंबई में है और मुंबई की आम भाषा क्या है?... हिंदी. इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है. अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो हम सुविचार तमिळ में लिखते' असा हा अत्यंत आक्षेपाह संवाद आहे. चेन्नईची भाषा तमिळ आहे, हे या लेखकाला माहीत आहे, याचा अर्थ मुंबईची भाषा मराठी आहे, हेही माहीत असणार. तरीही हिंदी पुढे केली जाते. हीच चूक यांनी अहमदाबाद किंवा बेंगळुरूच्या भाषेबाबत केली असती का? मराठी भाषा, मराठी माणूस यांची उपेक्षा करण्याची ही साथ वेळीच रोखली नाही तर भविष्यात हे अतिक्रमण वाढत जाईल आणि मराठी भाषा व समाजाच्या पुते मूळावर उठेल.