जिल्ह्यातील १६ हजार १३१ शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध होतील -जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

२८ फेब्रुवारी पर्यंत ठाणे - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अम्नोली आणि मुरबाड तालुक्यातील धसई येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यातील १६ हजार १३१ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी सांगितले.


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील अनोली आणि मुरबाड तालुक्यातील धसई येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. असनोली येथील १९२ तर धसई येथील ४९ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाणार आहे. 


या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील १६ हजार १३१ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ९६.६० कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या २८ फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले.


मी कर्जमुक्त होणार -शेतकरी वसंत पांडुरंग दिनकर


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे १ लाख रूपयांचे कर्ज माफ होवून मी कर्जमुक्त होणार असल्याचे समाधान अम्नोली येथील सोसायटीकडील १ लाख रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असताना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेमुळे मी कर्जमुक्त झालो हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे.


अम्नोली येथील लक्षमण दिनकर यांनीही आपले ३५ हजार रूपयांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले. तसेच धसई येथील थकीत शेतकरी सभासद धनाजी घोलप यांचे धसई ग्रुप सहकारी सेवा सोसायटीचे १ लाख ८० हजार रूपयांचे कर्ज घेतले. खराब हवामान आणि मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले त्यामुळे कर्ज परतफेड शक्य झाली नाही. आज शासनाच्या या योजनेमुळे मी कर्जमुक्त झालो आहे. हे सरकार शेतकयांचे सरकार आहे. थकीत कर्ज माफ होणार असल्याचा खूप आनंद आहे. या सरकारचे मनापासून आभार.


श्रीमती हर्षला घोलप यांचे ५१ हजाराचे कर्ज माफ झाल्यामुळे त्या खुश आहेत. घरगुती अडचणीमुळे त्या पिक कर्ज फेडू शकत नव्हत्या. शासन आमच्या सारख्या गोर गरीब जनतेच्या पाठीशी आहे. हि कर्जमुक्ती करून आम्हा शेतकऱ्याना शासनाने न्याय दिला आहे.