ठाणे : मार्च महिना सुरू झाल्यानंतरही ठाणे महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प जाहीर न झाल्याने लोकप्रतिनिधींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे बुधवारपासून रजेवर जात असल्याने आता अर्थसंकल्प कोण आणि कधी मांडणार, याबद्दलची अनिश्चितता वाढली आहे. महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादांचा परिणाम अर्थसंकल्प सादर होण्यास विलंब होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महापालिकेत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची कधीही बदली होऊ शकते, अशी चर्चा महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळेच सलग पाच वर्षे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणारे आयुक्त जयस्वाल हे यंदाचा अर्थसंकल्प सादर करू शकणार नाहीत, अशीही चर्चा आहे.