पालघर, दि. ५ (सा.वा.) - मत्स्यदुष्काळामुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे. अशावेळी कोळंबी प्रकल्प उभारून स्वयंरोजगाराची नवी संधी. उपलब्ध होऊ शकते. केवळ उत्पादन न घेता त्याचे . मार्केटिंगही केल्यास या व्यवसायाला कॉर्पोरेट लूक मिळू शकतो, असा कानमंत्र पालघरच्या तरुणांना देण्यात आला. निमित्त होते मत्स्य कोळंबी संवर्धन चर्चासत्राचे. रोजगाराची संधी देणाऱ्या या प्रकल्पाला उभारी देण्यासाठी आंध्र, गुजरातच्या धर्तीवर नवीन धोरण लागू करून या व्यवसायासंबंधीच्या शंका यावेळी दूर करण्यात आल्या. ..
पालघर जिल्ह्यातील निमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नियोजन भवन येथे राज्याचे प्रधान सचिव अनुपकुमार व पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथून आलेल्या कोळंबी संवर्धकांना या चर्चासत्रात उपसचिव श्रीनिवास शास्त्री, मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे, ठाणे-पालघर मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील, तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी मार्गदर्शन केले. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. त्यामुळे येथील युवकांना मत्स्य व्यवसायातून स्वयंरोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी नगर येथील जिवंत मासळी विक्रीचा कशाप्रकारे फायदा झाला याची माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त महेश देवरे यांनी दिली.