मुंबई - नंदूरबार, मेळघाट, पालघर, जव्हार, मोखाडा या आदिवासी पट्ट्यात सर्वाधिक बालमृत्यू होत असल्याची सरकारदरबारी नोंद असली तरी आता देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाला मुंबईत २०१८-१९ या वर्षात तब्बल १४०२ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग जोरदार प्रयत्न करीत असतानाही राज्यात तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूत झालेल्या वाढीसंदर्भात विधानसभेत आमदार मंगेश कुडाळकर, आशीष शेलार यांच्यासह अनेक सदस्यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्शाच्या लेखी उत्तरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. एच.एम. आय.एस.च्या अहवालानुसार राज्यात सन २०१८-१९ या काळात २ लाख ११ हजार ७७२ बालकांचे वजन जन्मतःच अडीच किलोपेक्षा कमी असून मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २२ हजार १७९ बालके जन्मली आहेत. तसेच याच कालावधीमध्ये १३ हजार ७० बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली असून या नोंदीमध्ये १४०२ नवजात बालकांच्या मृत्यूंची नोंद मुंबई शहरात झाली आहे, असे टोपे यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
मुंबईत सर्वाधिक बालमृत्यू. वर्षभरात १४०२ नवजात बालकांचा मृत्यू