आता सायबर गुन्हयांची उकल होणार जलदगतीने


मुंबई - गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, मागच्या पाच वर्षात राज्यात एकूण १६ हजार ५१२ सायबर गुन्हयांची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ ४ हजार ५३० गुन्हयांची उकल झाली आहे. परिणामी भविष्यात सायबर गुन्ह्यांची उकल जलदगतीने व अचूक होण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे अद्ययावत लॅब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ९१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 


वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत काँग्रेसचे सदस्य अनंत गाडगीळ यांनी तारांकित प्रश्न विचारला होता गेल्या दोन वर्षांत घडलेल्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरेसे नसल्याचे गाडगीळ यांचे म्हणणे होते. त्यास उत्तर देताना गृहमंत्री देशमुख म्हणाले की, सन २०१८ मध्ये ३ हजार ५११, २०१९ मध्ये ४ हजार ८२२ आणि गेल्या पाच वर्षांत एकूण १६ हजार ५१२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ४ हजार ५३० गुन्हे उघडकीस आले. सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे महिला आणि अल्पवयीन तरुणींना मेसेज पाठवल्याबाबत २०१८ मध्ये ८६७ आणि २०१९ मध्ये ७९९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


महाराष्ट्राचा सायबर सेल हा देशात प्रथम क्रमांकाचा सेल आहे. राज्यात एकूण ४३ सायबर लॅब्सना पोलिस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. या लॅब्समध्ये ५५० पोलिस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे अस्तित्वात आहे. मुंबईत ९१ पोलिस ठाण्यांत सायबर कक्ष अस्तित्वात आहे. बँकांमधील सायबर गुन्हे रोखण्यासाठी बँकांनी स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केले.