मुंबई : जगभरातील शहरांतील प्रदूषणाबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालात नवी मुंबई हे २०१९ मध्ये राज्यातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे उघड झाले आहे. जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबईचा क्रमांक ५१ वा आहे. तर जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक १६९ आहे.
'आयक्यूएअर' या स्वित्र्झलडस्थित संस्थेने २०१९ मधील प्रदूषणाच्या आकडेवारीवर आधारीत तयार केलेला जगभरातील चार हजार पाचशे शहरांचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. यामध्ये हवेतील पीएम २.५ या घटकाचा आधार घेण्यात आला आहे. अहवालानुसार जगभरातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांपैकी देशातील २१ शहरांचा समावेश होत असून, गाझियाबाद हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचे दिसून येते.
राज्यातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असून, हवेतील पीएम २.५ घटकाचे प्रमाण ६१.६ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतके असल्याचे आढळले. देशभरातील ९० शहरांतील प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार नवी मुंबईचा २७ वा क्रमांक असून, मुंबई ५४ व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार मुंबईच्या हवेतील पीएम २.५ घटकांचे प्रमाण २०१८ पेक्षा कमी झाले आहे. २०१८ मध्ये पीएम २.५ चे प्रमाण ५८.६ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतके होते, ते २०१९ मध्ये कमी होऊन ४३.५ मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर इतके झाले आहे. तर जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक १६९ आहे. गेल्या काही महिन्यात सफरच्या आकडेवारीनुसार नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ होत असताना सातत्याने दिसत आहे, पण त्यावर योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा', आक्षेप वातावरण संस्थेचे भगवान केसभट यांनी मांडला.