कोरोनाच्या भीतीने लोकलचे प्रवासी घटले मेट्रोनंतर रेल्वे डब्यांचे सॅनिटायझेशन होणार
___ मुंबई, - कोरोनाच्या दहशतीने सर्वत्र थैमान घातल्यामुळे आता मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही आपल्या लोकल ट्रेनच्या डब्यांना फिनाईलच्या पाण्याने धुण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे. उपनगरीय लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे लोकलच्या प्रवासात कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावास जादा वाव असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
__ कोरोना या संसर्गजन्य आजाराचा जगभर फैलाव झाल्यानंतर मध्य रेल्वेने तातडीचा उपाय म्हणून लोकलचे डबे रात्री फिनाईलने साफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी रात्रीपासूनच करण्याचे ठरविले असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. दक्षिण रेल्वेनेही आपल्या ट्रेन सॅनिटाईज करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मेट्रो रेल्वेनेही अशाच प्रकारे डबे स्वच्छ करण्याचा निर्णय अमलात आणला आहे. त्याच धर्तीवर लायझॉलसारख्या निजतुकाचा वापर करून लोकलच्या महत्त्वाच्या भागांना जेथे प्रवासी वारंवार स्पर्श करतात त्यावर स्प्रेचा फवारा मारून चांगले पुसून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
एका लोकलला साफ करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांना जुंपलेले असते. यापूर्वी लोकल ट्रेन रात्री कारशेडमध्ये आल्या की केवळ झाडून घेतल्या जात होत्या, तर दर १८ दिवसांनी लोकल संपूर्णपणे पाण्याने धुतली जात होती. आता रोज रात्री लोकल फिनाईलच्या पाण्याने पुसून घेतली जाणार आहे. प्रवासी वारंवार हात लावणाऱ्या स्टीलच्या हँडलना तसेच सिट्सना खिडक्यांना फिनाईलच्या पाण्याने पुसून घेतले जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ८४ लोकल असून मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या १६५ लोकल ट्रेन आहेत. अशा २४९ लोकल ट्रेनच्या दररोज ३००० फेऱ्या दररोज होतात. एरव्ही प्रत्येक लोकलला दर १८ दिवसांनी वॉशिंग प्लांटमध्ये धुतले जाते.
सीएसएमटीचे म्युझियम आणि हेरीटेज वॉक बंद
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट असलेल्या जगप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयातील हेरिटेज म्युझियम आणि हेरिटेज वॉक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या म्युझियमला भेट देण्यासाठी परदेशी पर्यटकांचीही गर्दी होत असते. लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये देखील अशा प्रकारची स्वच्छता राखली जात असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.