विद्यार्थ्यांना घरबसल्या करता येणार प्रमाणपत्रांचे साक्षांकन

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन


__ मुंबई, - मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे घरबसल्या साक्षांकित करता येणार आहेत. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घाटन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.


आदित्य ठाकरे यांच्या 'अ-६' या शासकीय निवासस्थानी हा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. किमान वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ____ मुंबई विद्यापीठाने आता कालसुसंगत अभ्यासक्रम सुरू करावेत असे सांगतानाच विद्यापीठातील नवीन उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.


याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्यासह सिनेट सदस्य प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.


मुंबई विद्यापीठात साक्षांकन सुविधा सुरू


। विद्यार्थ्यांना तीन-चार दिवसांत त्यांची प्रमाणपत्रे ऑनलाइन साक्षांकित करून दिली जाणार आहेत. त्यामुळे कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशी यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्यास तसेच नोकरीसाठी साक्षांकित प्रमाणपत्रांची मागणी केली जाते. सुमारे दहा हजार विद्यार्थी त्यांच्या प्रमाणपत्रांचे साक्षांकन करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करत असतात.