वाढत आहेत हृदयविकार नवी मुंबई- आजच्या डिजिटल युगात महिला दिन प्रत्येकाच्या मोबाईलवर साजरा होत असला तरी आपण आपल्या घरातील महिलांच्या आरोग्याबाबत किती जागरूक आहोत का याबाबत खरेच प्रश्नचिन्ह आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून ती जागरूक व्हावी आणि समाजातही तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, हे गरजेचे आहे. यातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे महिलांची रजोनिवृत्ती ही असून इन्स्टिट्युट ऑफ सोशल अॅन्ड इकोनॉमिक चेन्जने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, सध्या वयाच्या तिशीतच महिलांना रजोनिवृत्तीचा सामना करावा लागतोय. नुकतचं केलेल्या एका संशोधनानुसार, ज्या महिलांना वेळेच्या आधी रजोनिवृत्ती येते त्यांना मोठ्या प्रमाणात हृदयाचा आजार होण्याची शक्यता असते. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डतर्फे केलेल्या अभ्यासातून रजोनिवृत्ती आणि हृदयाचे आजार यांच्यामध्ये संबंध आढळून आलाय. याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ संजय तारळेकर सांगतात, 'हृदयविकाराचे प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे असा समज असला तरी महिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरणारे महत्वाचे कारण हे हृदयविकार आहे. सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, गरोदरपणामध्ये झालेल्या शस्त्रक्रिया या सर्वांमुळे महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा धोका निर्माण होताना दिसत आहे. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकार झटक्यांची तीव्रता जास्त असते, शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन महिलांना हृदयाच्या आजारांपासून प्रतिबंध करण्यास मदत करतं. रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजनची पातळी खालावली की शरीरातील फॅट आपोआप वाढतं. शरीरात झालेल्या या बदलांमुळे हृदयाचे आजार, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक यांचा धोका वाढतो: तसेच धूम्रपान, तंबाखूचे नियमित सेवन केल्यामुळे, केमोथेरेपी, काही कारणास्तव दोन्ही बीजांडे (ओवरीज) शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान निर्माण झालेले गंभीर दुष्परिणाम, अंडाशयातील गाठींचे आजार (पॉलिसिस्टिक ओवरी सिडोम) असलेल्या महिलांमध्ये वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षी पाळी येणे बंद होते व अनेकवेळा महिला या प्रक्रियेला नैसर्गिक ऋतुसमाप्ती मानतात व येथेच त्यांची गफलत होते व अनेक महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.'
रजोनिवृत्ती नंतर महिलांना हृदयाच्या आजारांचा धोका टाळायचा असेल तर दर वर्षाला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल तपासून घेतलं पाहिजे. धूम्रपानाची सवय लगेच सोडली पाहिजे कारण पुरुषांपेक्षा महिलांना धूम्रपानाचा त्रास अधिक होतो. धूम्रपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्या महिलांना हृदयाच्या आजारांचा धोका अधिक असतो तसेच रजोनिवृत्ती नंतर आहार आणि व्यायामाकडे काटेकोरपणे लक्ष देऊन मानसिक व शारीरिक ताणतणावाचं व्यवस्थापन योग्य रीतीने केले पाहिजे अशी माहिती डॉ संजय तारळेकर यांनी आज महिला दिनानिमित्त दिली.