मुंबई : प्रवासी भाडे थेट ५० टक्क्यांनी कमी करत मुंबईकरांना स्वस्तात मस्त प्रवास देणाऱ्या बेस्ट प्रवाशांच्या संख्येत गेल्या सात महिन्यांत १३ लाख ७७ हजार प्रवाशांची (दररोजचे सरासरी) भर पडली आहे. मात्र महसूलवाढीचे आव्हान कायम असून त्यात या काळात प्रति दिन सरासरी ५४ लाखांची घट झाली आहे.
__ बेस्टने ९ जुलै २०१९ पासून भाडेकपात केली. सध्या बेस्ट पाच किलोमीटरच्या साध्या प्रवासाकरिता पाच रुपये आणि वातानुकूलित प्रवासासाठी सहा रुपये भाडेआकारणी करते आहे. यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. भाडेकपातीआधी दररोज सरासरी १९ लाख २३ हजार प्रवासी बेस्टने प्रवास करत होते. हीच संख्या भाडेकपातीनंतर जानेवारी २०२० पर्यंत सरासरी २९ लाख ५ हजारापर्यंत गेली. फेब्रुवारी महिन्यात पाँ इंट टू पॉइंट सेवेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. आता दररोज सरासरी ३३ लाख प्रवाशी बेस्टने प्रवास करत आहेत. वांद्रे, सांताक्रूझ, देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड आगारांतर्गत सुटणाऱ्या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. प्रवासी वाढले असले तरी बेस्टच्या महसुलावर परिणाम झाला आहे. भाडेकपातीपूर्वी बेस्टला दररोज सरासरी २ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये महसूल मिळत होता. हाच महसूल सरासरी १ कोटी ८२ लाख ११ हजार रुपयांवर आला आहे.
सुट्टया नाण्यांनी बेस्टची तिजोरी भरली
भाडेकपात झाल्यानंतर बेस्टची तिजोरी सट्टया पैशांनी भरू लागली आहे. बेस्टकडे १२ कोटी रुपयांपेक्षाही सुटी नाणी जमा झाली आहेत. एक रुपया, दोन रुपये आणि पाच रुपयांच्या नाण्यांचा यात समावेश आहे.