मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) - प्लॅस्टिकविरोधात पालिकेने १ मार्चपासून जोरदार कारवाई सुरू केली असून आज तिसऱ्या दिवशीही कारवाईचा धडाका सुरू ठेवत साडेपाच हजार ठिकाणी धाडी टाकल्या आणि साडेसहा लाखांचा दंड वसूल केला. आजच्या कारवाईत ४०८ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले. पालिकेने गेल्या दोन दिवसांत ४०८१ ठिकाणी धाडी टाकून चार लाखांचा दंडवसूल केला, तर १०२८.०९७ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले आहे.
पर्यावरणरक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईसह राज्यभरात २३ जून २०१८ पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून बाजार, दुकानेआस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील ३१० निरीक्षकांच्या 'ब्ल्यू स्कॉड'च्या माध्यमातून मुंबईत कारवाई सुरू आहे. तरीदेखील मुंबईत अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांसारख्या प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मे २०२० पर्यंत महाराष्ट 'सिंगल युज डिस्पोजेबल प्लॅस्टिकमुक्त' पालिकेनेही मुंबईत जोरदार कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, १ मार्चपासून सुरू करण्यात आलेली कारवाई आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची . माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
तीन दिवसांत १० लाख ५० हजारांची दंडवसुली
दुकाने व आस्थापना विभागाकडून १६७४ ठिकाणी तपासणी करून २८७.४७० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ६५ हजार दंड वसूल करण्यात आला. परवाना विभागाने २६५५ ठिकाणी तपासणी करून १२०.५३० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून ४ लाख ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बाजारांमध्ये १२८० ठिकाणी तपासणी करण्यात आली. मात्र कालच्या कारवाईमुळे बाजारातील किरकोळ दुकानदारांनी धसका घेतला असून आजच्या कारवाईत प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळले नाही. गेल्या तीन दिवसांत १४३६ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून एकूण १० लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.