'कोरोना'च्या संकटात महागाईची आग! 'पेट्रोल-डिझेलची ३ रुपयांनी दरवाढ मोबाईल, माचिसही महागली


नवी दिल्ली,  - कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरातील जनता चिंतेत असताना केंद्र सरकारने त्यात महागाईची भर टाकली आहे. उत्पादन शुल्कात तीन रुपयांची वाढ केल्यामुळे शनिवारी मध्यरात्री १२ नंतर पेट्रोल- डिझेल महागले आहे. मोबाईलचा जीएसटी १२ वरून १८ टक्के वाढविताना माचिसही महाग केली आहे. त्यामुळे महागाईच्या आगीचा भडका उडाला आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होत आहेत. कच्चे तेल प्रतिबॅरल ४० डॉलरच्या खाली आले असताना नागरिकांना मात्र पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर २ रुपये उत्पादन शुल्क वाढविला आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी १ रुपये सेस लावला. त्यामुळे पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर थेट तीन रुपयांनी महागले आहे.


मोबाईलवर १८ टक्के, माचिसवर १२ टक्के जीएसटी


। मोबाईलवर सध्या १२ टक्के जीएसटी होता. त्यात वाढ करून १८ टक्के केला आहे. १ एप्रिलपासून मोबाईल महागणार आहेत.


। होम मेड माचिसवर ५ टक्के 'जीएसटी' होता. आता सर्व प्रकारच्या माचिसवर १२ टक्के जीएसटी करण्याचा निर्णय आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.


। विमानाच्या देखभाल, दुरुस्तीवरील जीएसटी मात्र, १२ वरून कपात करीत ५ टक्के केला आहे.