मोखाडा : कुपोषण आणि पाणीटंचाईविषयी संवेदनशील असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात फेकवारीच्या अखेरीसच पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईने होरपळणाला आसे ग्रामपंचायतीमधील सहा गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केल्याने मोखाड्यात पाणीटंचाईची पहिली ठिणगी पडली आहे. दरम्यान, गतसाली मोखाड्यातील टंचाईग्रस्त गाव पाड्यांनी शंभरी ओलांडली होती.
'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे मोखाड्यात प्रतिवर्षी जानेवारी अथवा फेकवारीपासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते. गतसाली जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. तर ९ जानेवारीला पहिला टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने समाधान व्यक्त केले जात होते, परंतु यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे. गतसाली पाणीटंचाईने मोखाडा तालुका होरपळून निघाला होता. ११६ गावपाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाही ऊन्हाची तीव्रता वाढू लागताच टंचाईला सुरुवात झाली आहे.