मिरारोड- मराठी एकीकरण समिती, अनेक सामाजिक संस्था आणि शिवप्रेमी यांच्या सहकार्याने भाईंदर येथील बाळासाहेब ठाकरे मैदानात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
शिवजन्मोत्सव निमित्ताने १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबाबत माहिती देताना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले की, १८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या मराठी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वकृत्व स्पर्धा, गड किल्ले प्रतिकृती बनविणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सुद्धा आहे. तर संध्याकाळी महिलांसाठी विशेष पैठणी स्पर्धात्मक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तर १९ आयोजन फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता काशीमिरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर ९.३० वाजता महाराजांच्या पुतळ्या जवळून दुचाकी, चारचाकी वाहनांसह शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरु होणाऱ्या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव, हळदीकुंकू समारंभ, शहीर यशवंतराव जाधव यांचा पोवाडा, महाराजांवर आधारित महाराष्ट्र युगपुरुष गाथा हा संगीतमय कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी बक्षीस समारंभ असा कार्यक्रम आखण्यात आला.