मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – पीएमसी बँकेनंतर रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले असून खातेदारांना फक्त ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. लग्न, शिक्षण आणि उपचारांसाठी जास्त पैसे काढता येतील पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे येस बँकेच्या खातेदारांचे । हाल होण्याची शक्यता आहे.
येस बँकेने दिलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड झालेली नाही. बहुतांश कर्जे बुडीत गेली आहेत.बँकेची पत घसरल्याने रिझर्व्ह बँकेला आर्थिक निर्बंध घालावे लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्त अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३ एप्रिलपर्यंत हे निबंध राहतील असे सांगत रिझर्व्ह बँकेने खातेदारांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, एसबीआयने हिस्सेदारी खरेदी केल्यास येस बँकेला बराच आधार मिळणार आहे.