| भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवेचे आज लोकार्पण


अलिबाग, - बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग ही रो-रो बोटसेवा उद्या १५ मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. रो-रो बोट व रो पॅक्स टर्मिनल उद्यापासून सुरू होत असून दुपारी ठिक १२ वाजता रो-रो बोट मांडवा येथून भाऊच्या धक्क्याकडे कूच करणार आहे.


भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग ही रो-रो पॅक्स फेरीसेवा कधी सुरू होणार, असा सर्व प्रवाशांना प्रश्न पडला होता. ११ मार्च रोजी ग्रीसवरून आणलेल्या प्रोटो प्रोसेस एक्सव्ही या अत्याधुनिक फेरीबोटीची चाचपणी एमएमबी, बीपीटी, बोट नोंदणी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती. यावेळी भाऊचा धक्का ते मांडवा अलिबागदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. फेरीबोटीची ही चाचणी यशस्वी झाली असून उद्या १५ मार्च रोजी या रो-रो सेवा सुरू होत आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण होणार होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सोहळे रद्द करण्यात आले असल्याने कोणत्याही उद्घाटनाविनाचा ही सेवा सुरू होणार आहे.


। एकाचवेळी ५०० प्रवासी व १५० वाहने


। भाऊचा धक्का ते मांडवा ४५ मिनिटांत प्रवास


। सर्व सुविधायुक्त प्रवासी टर्मिनल


। इंधन खर्च, वेळेची बचत, पर्यावरणस्नेही व आरामदायी प्रवास


। एम २ एम फेरीस कंपनी ही फेरीसेवा देणार आहे


मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा


कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नसला तरी जनतेच्या सोयीसाठी उद्यापासूनच ही सेवा सुरू होत आहे. या सेवेस आपल्या मनापासून शुभेच्छा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.