भाईंदर, दि. ५ (सा. वा.) _ - पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या घोडबंदर येथील चेना नदीचे पाणी आता मीराभाईंदरकरांची तहान भागवणार L आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चेना नदीवर पाणी अडवणारी योजना तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १५ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून दोन बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर शहराच्या ठाणे वेशीवर घोडबंदर गावात चेना नदी आहे. दर पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. मात्र या नदीचे पाणी अडवण्याचे कोणतेही उपाय आतापर्यंत झालेले. नव्हते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेऊन चेना नदीवर पाणी अडवणारी योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पाठपुराव्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत चेना नदीतील वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावेत,असे आदेश दिले. त्यानुसार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी नदी परिसराची पाहणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन, उपविभागीय अभियंता धनराज पाटील, अमित पारधी, प्रकल्प सल्लागार डी. टी. डांगे, आलम, पालिकेचे सुरेश वाकोडे आदी अधिकारी उपस्थित होते.
नदीची ड्रोनने पाहणी करून संपूर्ण सर्वे १५ दिवसांत करण्यासंदर्भात यावेळी सहमती झाली. तसेच या ठिकाणी कोल्हापुरी बांधारे बांधणे असे निर्णय घेण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम सुरू होणार असून दरवर्षी १० एमएलडी पाणी मिळणार, अशी माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.
आदिवासी पाड्यांची पायपीट थांबणार
चेना नदी पाण्याची योजना झाल्यास मीरा-भाईंदरला आणखी एक पाण्याचा स्त्रोत मिळेल. पण त्याचा सर्वाधिक लाभ परिसरातील आदिवासी पाड्यांना मिळणार आहे. चेना व आसपासच्या भागातील आदिवासींना पाण्यासाठी आजही विहिरी आणि कुपनलिकेवर अवलंबून राहावे लागते. ही योजना झाल्यास त्यांची पायपीट थांबेल. - प्रताप सरनाईक, आमदार.