डहाणू, - डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चिंचणीत पाण्याची प्रचंड चणचण निर्माण झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून नळाला एक टिपूस पाणीही आले नसल्याने ग्रामस्थांना खासगी बोअरवेलवाल्यांकडील विकतचे गढूळ पाणी घ्यावे लागत आहे. मात्र ही पाणीबाणी टंचाईमुळे नसून वर्षानुवर्षे पाणीपट्टी न भरल्यामुळे ओढावल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामस्थांनी तब्बल एक कोटीची पाणीपट्टी थकवल्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केल्याचे समोर आले आहे.
पाच हजार कुटुंबे असलेल्या चिंचणी ग्रामपंचायत क्षेत्रात सुमारे २हजार ८१९ नळकनेक्शनधारक आहेत. त्यांना जवळच्या साखरा धरणातून जिल्हा परिषदमार्फत पाणीपुरवठा केला जातो, परंतु येथील बहुसंख्य नळकनेक्शनधारक पाण्याची बिले भरत नसल्याने ग्रामपंचायतीची आर्थिक कोंडी झाली आहे. प्रत्येक ग्राहकावर सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये अशी एकूण एक कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार सूचना व नोटिसा बजावून तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देऊनही ग्रामस्थ पाणीपट्टीची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने आता थेट पाणीपुरवठाच बंद करण्याचे हत्यार उपसले आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच गेल्या सहा-सात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद केल्याने पाण्यासाठी चिंचणीकरांचे हाल होत आहेत.
गावातील अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची विहीर नसल्याने खासगी बोअरिंगधारकांकडून गढूळ पाणी पिण्याची वेळ चिंचणीकरांवर आली आहे.
डहाणू पंचायत समितीकडून येणारे पाणीबिल ग्रामपंचायत चिंचणी भरू शकत नसल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
थकबाकीदारांच्या नावाने 'दवंडी
___ थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या जाहीर करण्याचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामपंचायतीने प्रत्येक प्रभागात रिक्षा घेऊन थकबाकीधारकांचे नाव, रक्कम स्पीकरवर जाहीर करून एकप्रकारे दवंडीच पिटण्यात येत आहे. जर प्रतिसाद मिळाला नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई ग्रामपंचायत प्रशासन करणार असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले.