१५ वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अखेर भारतात


अखेर बंगळुरू - अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पुन्हा एकदा सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांच्या पथकानं संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारीला बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यानंतर रवी पुजारीला भारतात आणण्यास भारतीय तपास यंत्रणांना यश आलं आहे. 


पुजारी याला कर्नाटक येथील एका गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. सोनेगलमधून त्याला सकाळी नवी दिल्लीत आणण्यात आलं आणि तेथून थेट बंगळुरुला नेण्यात आलं. त्याला सकाळी ११ वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. RAW च्या मदतीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी त्याला पश्चिम आफ्रिकेतल्या सेनेगल इथे अटक केलं होतं. रवी पुजारी हा भारताचा वॉन्टेड आरोपी आहे. त्याच्या विरोधात मुंबई, कर्नाटकसह अनेक राज्यात जवळपास २०० गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीला पकडण्यासाठी रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये गेले होते. शनिवारपासून त्यांच्या प्रत्यापर्णाची तयारी सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आलं आहे. रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता अधिकाऱ्यांनी केली आणि त्याला भारतात आण्याचा मार्ग मोकळा झाला. तब्बल १५ वर्षानंतर त्याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आलंय.


अनेक गुन्ह्यांची नोंद __


पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. तर महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याच्या विरूद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरातमध्ये खंडणी प्रकरणी त्याच्याविरूद्ध ७५ गुन्हे नोंद आहेत.