__ मध्य रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून १८२ कोटींचा दंड वसूल


मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून तसेच बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने राबवलेल्या मोहिमेत एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या दहा महिन्यांच्या काळात तब्बल १८२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यातच अशा कारवाईत मध्य रेल्वेने १४.४१ कोटींचा दंड वसूल केला आहे. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये ११.९२ कोटी दंड वसूल झाला होता. म्हणजे यंदा दंडाच्या रकमेत २०.८८ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान विनातिकीट प्रवास करणारे आणि बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक करणाऱ्यांकडून १८२.५० कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १५८.९३ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता. म्हणजे यंदा दंडाच्या रकमेत १४.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या फेब्रुवारी २०२०मध्ये रिझर्व्ह तिकिटाच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचे २६६ गुन्हे दाखल होऊन १.४६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.