अकोले - राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी अकोले तालुक्यात भजन-कीर्तनासह रस्त्यावर मोर्चा काढत कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये गावागावातून हजारो ग्रामस्थ, वारकरी, तरूण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ त्याचे मूळगाव इंदोरी ते अकोले अशी रॅली नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी काढली होती. तृप्ती देसाई यांनी महाराजांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी निषेध केला होता. यावेळी इंदोरीकर महाराजांना काळे फासण्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांना अकोले तालुक्यात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार करीत बंद पाळला. अकोले तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ठराव केला. अकोले येथे बाजार तळावर सकाळी ११ वाजता निषेध सभा झाली.
निवृत्ती महाराजांच्या नादी लागू नको. ही अकोलेची माती आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती वाकचौरे यांनी यावेळी दिला. अकोल्यातील सर्व महिलांनामध्ये मला आज स्मिता अष्टेकर दिसतात. या तालुक्यातील सर्व महिला वाघिणी आहेत, असे अष्टेकर म्हणाल्या. यावेळी उपस्थित महाराजांच्या समर्थकांनी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.