मीरा-भाईंदरच्या महापौर निवासाची दुरवस्था .लाखो रुपयांच्या साहित्याला भंगारावस्था; कबुतरांनी घेतला बंगल्याचा ताबा


भाईदर : मीरा-भाईदर महापालिकेच्या आलिशान महापौर निवासात यापूर्वीच्या महापौरांनी पाठ फिरवल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. बंगल्याची लाखो रुपये खर्चुन तयार केलेली सजावट भंगार झाली असून कबुतरांनी बंगल्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे विद्यमान महापौरांची इच्छा असूनही त्यांना या घाणीमुळे बंगल्यात राहता येणार नाही


महानगरपालिकेची २००२ रोजी स्थापना झाली. या स्थापनेवेळीच महानगरपालिकेकडून महापौर निवास तसेच आयुक्त निवासाची निर्मिती करण्यात आली. कोटयवधी रुपये खर्च करण्यात आल्यानंतर केवळ पालिकेचा पदभार स्वीकारणाऱ्या आयुक्तांनीच आपल्या निवासाचा वापर केला; परंतु महापौर निवास सदैव ओस पडलेच आढळून आले. गेल्या १८ वर्षात आतापर्यंत केवळ २००५ साली मध्यमवर्गीय कुटुंबातील तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या निर्मला साळवी यांनी दोन वर्षाकरिता आपले वास्तव त्या बंगल्यात केले होते. निर्मला साळवी वास्तव्य करण्यास आल्याकारणामुळे पालिकेकडून टेबल, सोफा तसेच घरगुती अशा आवश्यक साहित्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले; परंतु त्यांचा कार्यकाळ समाप्त होताच त्याच्यानंतर एकाही महापौरांनी महापौर निवासाचा वापर न केल्यामुळे त्या सर्व वस्तू अतिशय खराब झाल्याचे आढळून आले आहे. यंदा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड २६ फेब्रुवारी रोजी पार पडली. या वेळी पुन्हा महापौर पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. भाजप पक्षातून ज्योत्स्ना हसनाळे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी वास्तव्य करण्याकरिता महापौर निवासाला भेट दिली; परंतु महापौर निवासाची दयनीय अवस्था झाल्यामुळे त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने आपल्याच राहत्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर निवासाच्या देखरेखीकरिता पालिकेकडून सुरक्षा कर्मचारी आणि नोकर मनी पुरवण्यात येतात; परंतु पुन्हा महापौर निवासाच्या देखरेखीकरिता लाखो रुपये खर्च करावे लागण्यात असल्यामुळे प्रशासनाला गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय खर्च करूनदेखील महापौरांनी त्या बंगल्याचा वापर न केल्यास पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान उचलावे लागण्याची भीती प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.