कोल्हापूर : तेल कंपन्यांकडून ग्राहकांना १२ अनुदानित सिलिंडरनंतर मिळणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांना २७७ रुपये जादा देऊन सिलिंडरची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याचे गणित कोलमडणार आहे. या नवीन दरवाढीची अंमलबजावणी गॅ स वितरकांकडून सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांमधून या दरवाढीबद्दल संतप्त । प्रतिक्रिया उमटत आहेत.
जागतिक बाजारपेठेत इंधनदरात वाढ झाल्याचे कारण सांगून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात १४४ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. यामुळे १३ पासूनची पुढील विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकाला ८४५ रुपये ५० पैशांनी खरेदी करावी लागणार आहेत. अनुदानित सिलिंडरचा दर सध्या ५६८ रुपये इतका आहे.
सरासरी याच दराने ग्राहकाला १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत १२ सिलिंडर मिळतात. यावर कोणतीही दरवाढ झालेली नाही; परंतु 'अनुदानित'चा कोटा संपून तेराव्या सिलिंडरपासून जे सिलिंडर खरेदी करावे लागते, त्याला 'विनाअनुदानित'चा दर लागू होतो. त्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जवळपास गेल्या सहा वर्षांतील ही सर्वांत मोठी वाढ असल्याचे दिसून येत आहे.
या नवीन दरानुसार गॅस वितरकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. चारजणांचे कुटुंब असलेल्यांना एक सिलिंडर कसेबसे महिनाभर जाऊ शकते; परंतु एखाद्या कुटुंबात चारपेक्षा अधिकजण असल्यास हा कालावधी कमी होऊन तो २० ते २५ दिवसांवर येतो. त्यामुळे आर्थिक वर्षातील १२ अनुदानित सिलिंडरचा कोटा लवकरच संपतो. त्यानंतर विनाअनुदानितच्या माध्यमातून गॅस सिलिंडर खरेदी करावे लागते. त्याची झळ संबंधितांना बसते. विनाअनुदानितचा दर पूर्वी ६९९ इतका होता. १२ फेब्रुवारीला दरवाढीनंतर तो ८४५ रुपये झाला आहे. प्रत्यक्षात विनाअनुदानित सिलिंडरची १४४ रुपये ५० पैसे इतकी दरवाढ झाली असली तरी, सध्या अनुदानित सिलिंडरसाठी असलेल्या ५६८ रुपयांच्या तुलनेत विनाअनुदानितसाठीचा वाढलेला दर हा २७७ रुपये आहे. यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय ग्राहकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून या निर्णयाबाबत फेरविचार करण्यास भाग पाडावे, असा सूर उमटत आहे.