मुंबई : कार्यालयीन वेळेत प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरणारी आणि प्रतिसादासाअभावी प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेली ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकल आता शनिवार-रविवारी, सुट्टीच्या दिवाशीही चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
३० जानेवारीला पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलला मोठ्या उत्साहात हिरवा कंदील दाखवला गेला असला तरी प्रवाशांकडून या गाडीला थंड प्रतिसाद आहे. सध्या वातानुकूलित लोकलने सरासरी केवळ ८० ते ९० प्रवासी (प्रत्येक फेरी) प्रवास करतात. मात्र वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकलच्या १६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. फेऱ्या कमी झाल्याने शेकडो प्रवाशी नाराज आहेत. परंतु वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी झालेल्या नाहीत. दुसरीकडे या गाडीला अद्यापही प्रवाशांची प्रतीक्षा आहे. आता वातानुकूलित गाडीला प्रतिसाद वाढवण्यासाठी ती शनिवार आणि रविवारीही चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आहे.
सध्या सेवेत असलेली लोकल सोमवार ते शुक्रवापर्यंतच धावते. अन्य दोन दिवशी वातानुकूलित लोकलची देखभाल-दुरुस्ती केली जाते. मात्र दुसरी वातानुकूलित लोकल सेवेत आल्यामुळे आता शनिवार-रविवारही वातानुकूलित लोकल सेवा देणे शक्य आहे.