येस बँकेची गाडी बुधवारपर्यंत येणार रुळावर


एसबीआयसह खासगी बँका गुंतवणार दहा हजार कोटी रुपये


नवी दिल्ली,  - येस बँकेची गाडी येत्या बुधवारपर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह (एसबीआय) देशातील आघाडीच्या खासगी बँका मिळून येस बँकेत १०३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानेही या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे.


येस बँकेला वाचवण्यासाठी एसबीआयसह आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकही गुंतवणूक करणार आहेत. बँकेतील पैसे काढण्यास घातलेले निर्बंधही बुधवारपर्यंत उठवले जातील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली.


एसबीआयकडून येस बँकेत ७२५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. एसबीआयच्या दोन संचालकांचा समावेश येस बँकेच्या संचालक मंडळात केला जाणार आहे. आयसीआयसीआय बँक एक हजार कोटी, कोटक महिंद्रा बँक ५०० कोटी, एचडीएफसी एक हजार कोटी तर अॅक्सिस बँक ६०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. या खासगी बँकांच्या संचालक मंडळानेही त्याला मान्यता दिली आहे.


बँक घोटाळ्यांचे प्रकार एकापाठोपाठ एक उघड होऊ लागल्याने देशातील नागरिकांचा बँकांवरील विश्वास उडू लागला आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली येस बँकेला वाचवण्याची योजना बनवण्यात आली. बँकांबरोबरच काही खासगी गुंतवणूकदारही येस बँकेमध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे.