वसई/नालासोपारा- पश्चिम रेल्वेवरील वैतरणा नदीवरील पूल क्र.९२ व ९३ च्या कार्यक्षेत्राच्या पोहोच मार्गामध्ये शनिवारपासून ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रेती उत्खनन व नौकानयनावर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी बुधवारी दिले आहेत.
वैतरणा नदीवरील पुलाबाबत रेल्वेचे मुख्य अभियंता यांनी या रेल्वेपुलाबाबत संभाव्य धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केल्याने ही बंदी घातली आहे.
रस्ते, गल्ल्या आणि मार्ग, पूल, खंदक, धरणे आणि त्यांच्यावरील किंवा त्यांच्या बाजूची कंपणे आणि पूर्ण भरतीच्या पाण्याच्या खुणेच्या खालील समुद्राचा, बंदराचा व खाड्यांचा आणि नद्या, ओहोळ, नाले, सरोवर व तळी आणि सर्व कालवे व पाण्याचे पाट आणि साचलेले सर्व पाणी व वाहते पाणी इत्यादीवर राज्य सरकारचा मालकी हक्क आहे. या कायदेशीर बाबीनुसार ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी वैतरणा नदीवरील रेल्वे पूल व इतर पुलाच्या ६०० मीटर कार्यक्षेत्रात पोलिसांनी २४ तास गस्त ठेवली आहे. तसेच, पुलाच्या दोन्ही बाजूस ६०० मीटर (२ हजार फूट) च्या क्षेत्रात २५ नोव्हेंबर पर्यंत रेती उत्खननास बंदी घालण्यात आली आहे. वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूस ६०० मीटर अंतरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे नौकानयन मार्गाचा वापर करण्यास मनाई आदेश लागू केला आहे.