बदलापूर, - ठाणे, डोंबिवलीनंतर झपाट्याने वाढणाऱ्या बदलापूर शहरात गुन्हेगारीही तितक्याच जलदगतीने वाढत आहे. या घटनांना आळा घालतानाच गुन्ह्यांची उकल तातडीने करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांसह चौकांमध्ये ' ७७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर या कामाच्या निविदा निघणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरावर यापुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. 'बदलापुरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामासाठी तुळगानबदलापुर नगर परिषदेने ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता. त्या डीपीआरनुसार बदलापुरात ३५ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार होते. नगर परिषदेच्या विकासकामांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तांत्रिक मंजुरी देत असते. मात्र यासाठी आयटी विभागाकडून मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आल्याने नगर परिषदेने पोलिसांशी संपर्क साधला. गृहविभागामार्फत ठाणे जिल्ह्यात अनेक शहरांत अशा प्रकारचे सीसीटीव्हीं कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत आता बदलापूर शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या अभियंत्यांनी सांगितले.
संयुक्त पाहणी दौऱ्यानंतर निर्णय
जानेवारी महिन्यात कुळगाव-बदलापूर नगर परिषद, स्थानिक पोलीस व शासनाच्या गृहविभागाचे कन्सल्टंट यांनी बदलापूर शहरात संयुक्त पाहणी दौरा केला होता. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शहरातील७७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. शासनाचे कन्सल्टंट या कामाचा डीपीआर तयार करणार असून गृहविभागाची मंजुरी घेऊन गृहविभागाच्या आयटी विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन या कामासाठी शासनाकडून निविदा काढण्यात येणार आहे.