पुणेः एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड शिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येईल,असे सर्व आयटी दृष्ट्या सक्षम व हॅक न करता येणारे आधुनिक बायोमेट्रिक उपकरण सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून ग्राहकांना पुढील काळात बोटाचे ठसे देवून घर बसल्याही आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने बायेमेट्रिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन केले असून तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम बायोमेट्रिक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता केवळ हाताच्या बोटांचे ठसे पुरेसे ठरणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर म्हणाले,विभागाने तयार केलेले उपकरण हे आधार सव्हरशी जोडण्यात आले आहे. आधारच्या सव्हरवरून संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे जुळत असल्याचा संदेश उपकरणावर आल्यानंतर आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया सुरू होते. प्लास्टिक,जिलेटिन किंवा डेंटल मटेलिअर पासून तयार केलेल्या कोणत्याही कृत्रिम हाताच्या बोटांच्या ठशांचा वापर करून हे उपकरण हॅक करता येणार नाही.याबाबतची तंत्रज्ञान विभागाने काळजी घेतली आहे
अभ्यंकर म्हणाले,या उपकरणाकडून बोटांमधील जिवंतपणा (लाईव्हनेस) तपासला जातो.त्यामुळे कोणत्याही कृत्रिक बोटांच्या ठशांचा वापर करून आर्थिक व्यवहार करणे कोणालाही शक्य होणार नाही.आधार सव्हरने ठसे तपासून दिल्यानंतर बँकेचे काही प्रोटोकॉ ल ग्राहकांना पूर्ण करावे लागतील. त्यानंतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येतील,अशा प्रकारची सुविधा देणारे आधुनिक उपकरण विद्यापीठाने तयार केले आहे.
सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बायोमेट्रिक उपकरण ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बँकेने विद्यापीठाकडून काही उपकरणे तपासणीसाठी घेतले आहेत. या उपकरणांवर थंड व उष्ण वातावरणात चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या उपकरण किती सक्षम आहे. हे सुद्धा बँकेकडून विविध स्तरावरून तपासले जात आहे. बँकेने बायोमेट्रिक उपकरण घेण्यास प्राथमिक तयारी दर्शविली आहे.परंतु, किती उपकरणे खरेदी करणार याबाबतची कल्पना दिलेली नाही.मात्र,विद्यापीठ किती उपकरणे व कोणत्या कंपनीच्या सहकायातून तयार करून दिली जाणार आहेत,याबाबतची माहिती विद्यापीठातर्फे बँकेला नुकतीच कळविण्यात आली आहे,असेही अभ्यंकर यांनी सांगितले.