मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत भीमसेन जोशी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय | अवहेलनेचा प्रत्यक्ष महिला डॉक्टरांना ही बसला याचा फटका

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या आणि सध्या शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नागरिकांना गैरसोयीचा नेहमीच अनुभव आला आहे. जोशी रुग्णालयात योग्य उपचार आणि खोली न मिळालयने या महिला डॉक्टरला खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले.


सामान्य नागरिकांचा वाईट अनुभव असतानाच पालिकेच्या वैद्यकीय सेवेत नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉ. तेजस्विनी लांजेकर यांनाही पालिकेच्या कारभाराचा फटका बसला. मीरा रोडच रसाज येथील आरोग्य केंद्रात त्या कार्यरत असून प्रकृती बिघडल्यामुळे त्या रजेवर होत्या. गेल्या सोमवारी त्या कामावर पुन्हा रुजू झाल्या. मात्र पकृती बिघडल्याने त्यांना कर्मचाऱ्यांनी आधी पालिकेच्या मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेले. रक्ततपासणी केल्यावर तेथील डॉक्टरांनी भाईंदरच्या जोशी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. पण पालिकेची रुग्णवाहिकाही त्यांना देण्यात आली आहे. डॉ. लांजेकर यांना रिक्षातून जोशी रुग्णालयात नेले.


जोशी रुग्णालयातही त्यांना उपचार सुरु करण्यासाठी सुमारे तासभर ताटकळत ठेवण्यात आले. त्यांना स्वतंत्र खोली देण्याऐवजी जनरल वॉर्डमध्येच दाखल केले. विशेष म्हणजे, स्वतंत्र खोल्या असूनही त्यातील काहींमध्ये सामान भरलेले आहे, तर काहींच्या चाव्याच स्वत:कडे ठेवल्याने डॉ. लांजेकर यांना खोलीच मिळाली नाही. त्यानंतर उपचारांअभावी तसेच सुविधा नसल्याने रात्री उशिरा त्यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेऊन दाखल करण्यात आले. चार दिवस त्या आजारी असल्याने आल्या नव्हत्या. सोमवारी घडलेला हा प्रकार नुकताच उघड झाला आहे. महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर आणि उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला नाही. तर प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी, नेमका काय प्रकार घडला आहे याची माहिती घेतो, असे सांगितले.