बलात्कारपीडितेची साक्ष नेहमीच विश्वासार्ह मानली जाऊ शकत नाही!


बलात्कारपीडितेची | साक्ष नेहमीच पुरेसा पुरावा वा विश्वासार्ह म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत ठाणेस्थित १९ वर्षांच्या तरुणाची उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निदीष सुटका केली. अशा प्रकरणांमध्ये पीडितेची साक्ष ही ठोस आणि विश्वासार्ह असायला हवी, असेही न्यायालयाने निकाल देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.


बलात्कारपीडितेची साक्ष ठोस आणि विश्वासार्ह नसेल तर अशा प्रकरणातील आरोपीला संशयाचा फायदा दिला जाऊ शकतो, असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी १९ वर्षांच्या सुनील शेळके याची बलात्काराच्या आरोपातून सुटका करताना नमूद केले. कनिष्ठ न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवून सूनावलेल्या सात वर्षांच्या शिक्षेला शेळके याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


मार्च २००९ मध्ये ही | घटना घडली होती. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी गावकरी होळीचा आनंद लुटत असताना आरोपी आणि त्याच्या दोन मित्रांनी तिला पकडून नदीजवळील ओसाड जागी नेले आणि तेथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी आपण घरी आल्याचे आणि आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती कुटुंबीयांना दिल्याचा दावा या पीडितेने केला होता. महिन्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला; परंतु त्याच वेळी या घटनेपूर्वी पीडित तरुणी आणि शेळके दोघेही लग्न करणार होते, ही बाबही पुढे आली. शेळके याने आपल्या अपिलात त्याच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. शिवाय त्या दोघांचे काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही याचा वचपा काढण्यासाठी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला.


न्यायालयाने या सगळ्या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या. पीडित तरुणीने तिच्यासोबत नेमके काय झाले हे ठाम व स्पष्टपणे सांगितलेले नाही. शिवाय वैद्यकीय अहवालातही तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळलेल्या नसल्याचे उघड झाले. पीडितेचे आरोपीशी लग्न होणार होते याची घटनेआधी चर्चा होती; किंबहुना जो पुरावा पुढे आला आहे त्यावरून घटनेच्या दिवशी दोघेही एकत्र होते.