मुंबई- गुगल या अग्रगण्य सर्च इंजिनचा दुरुपयोग करून गंडा घालणाऱ्या ऑनलाइन भामट्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई, महाराष्ट्रासह देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची माहिती 'गुगल'द्वारे जाणून घेणाऱ्या पर्यटकांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशा फसवणुकीबाबत सायबर महाराष्ट्रसह अन्य तपास यंत्रणांनी केलेल्या सूचनांना 'गुगल'ने केराची टोपली दाखवल्याने भामट्यांचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागरिकांचा पर्यटनाकडे वाढलेला कल, बसल्याजागी पर्यटनस्थळांची संकेतस्थळावर माहिती मिळवण्याची, ऑनलाइन शुल्क भरून आरक्षण करण्याची सुविधा लक्षात घेऊन चोरांनी लक्ष पर्यटकांकडे वळविले आहे. जास्तीतजास्त पर्यटक गळाला लागावेत यासाठी भामट्यांनी दिवाळीची सुटी सुरू होण्याआधीच गुगलचा दुरुपयोग करून जाळे विणले आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. गुगल सर्च इंजिनचा वापर करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळवणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. परिमंडळ वन अधिकारी मनोज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिवाळीच्या सुटीत (२१ ऑक्टोबर) दमणहून मुंबईत पर्यटनासाठी येऊ पाहणाऱ्या शैलेंद्र मिश्रा यांनी गुगल सर्च इंजिनचा वापर करून राष्ट्रीय उद्यानाची माहिती घेतली. तेव्हा अधिकृत संकेतस्थळासोबत संपर्कासाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक मिश्रा यांना आढळला. त्यावर संपर्क केला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने १० रुपये प्रवेश शुल्क ऑनलाइन भरण्यास सांगितले. या व्यवहारासाठी मिश्रा यांचे कार्ड तपशील घेण्यात आले आणि त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १६ हजार रुपये काढण्यात आले. त्यांच्यासारखाच अनुभव मंबईबाहेरील जडेजा कुटुंबाला आला. अन्य कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून या दोघांनी उद्यानाला हा प्रसंग कळवला.
त्यानंतर उद्यानाच्या परिमंडळ वन अधिकाऱ्याने गुगलवर पाहणी केली असता उद्यानाच्या नावासोबत अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांक आढळला. त्यावरून मिश्रा, जाडेजा कुटुंबाने दिलेल्या माहितीची खातरजमा झाली. वन अधिकाऱ्यांनी गुगलशी पत्रव्यवहार करून संबंधित क्रमांक भामट्यांचा असून त्याद्वारे फसवणूक सुरू असल्याची कल्पना दिली. तसेच हा क्रमांक काढून टाकण्याची विनंती केली.