मुंबई- शहर आणि उपनगरात मेट्रो जाळे निर्माण झाल्यानंतर प्रवाशांना इच्छितस्थळी जाणे सुकर व्हावे, यासाठी एमएमआरडीएने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो रेल्वेस्थानक परिसरातील गर्दीचे नियोजन कसे असावे, यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यासाठी तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्लूआरआय) इंडिया रॉस सेंटर यांनी स्टेशन एक्सेस अँड मोबोलिटी प्रोग्रॅम (स्टॅम्प) हा उपक्रम हाती घेतला असून तो राबविण्यासाठी एकूण ८० कंपन्यांचे अर्ज आले होते. यापैकी २८ कंपन्यांना परीक्षकांसमोर सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. त्यामधून १४ जणांची निवड झाली होती.
यापैकी तीन कंपन्यांची अंतिम निवड एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली. या निवड झालेल्या कंपन्यांना मुंबई मेट्रो स्थानक, परिसरात गर्दीचे नियोजन करण्याच्या कामासाठी पथदर्शी प्रकल्प राबवता येणार आहे.