जव्हार, मोखाड्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीची प्रतीक्षा


मोखाडा- जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा दुष्काळामुळे मेटाकुटीला आला आहे अडिच महिने पावसाने ओढ दिल्याने जव्हार मोखाड्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली असतानादेखील आणेवारी जास्त दाखवल्याने दुष्काळाच्या यादीतून 'जव्हार-मोखाडा' हे कुपोषणाने पीडित असलेले तालुके डावलले. दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आत्महत्या कराव्या लागणार का, असा संतप्त सवाल आता जव्हार मोखाड्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु अद्यापही जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले नसल्याने शेतक-यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सप्टेंबर महिन्यातील कडक उन्हामुळे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश उभे पीक करपून गेले. भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढला. वाढत्या तापमानात भातावरील विविध रोगांचा प्रसार होऊन भात पीक तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना पावसाने हुलकावणी दिल्याने आवश्यक पाणी शेतीला मिळाले नाही. त्यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर उभे भात पीक पेटवून देण्याची नामुष्की ओढवली. यंदा सुरूवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ९५ टक्के भाताची रोवणी करण्यात आली; परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भात शेती पावसाअभावी धोक्यात आली. त्यामुळे अनेक विघ्नांवर मात करीत केली जाणारी पारंपरिक शेती पुढे करायची का नाही, असा प्रश्न उभा ठाकला असताना दुष्काळाच्या यादीतून जव्हार मोखाडा हे तालुके वगळून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.