पालघर- पालघर तालुक्यातील झोपडपट्टी व गजबजलेल्या वसाहतीमध्ये अमली पदार्थाची राजरोस विक्री होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या नंतर अमली पदार्थाच्या आहारी महाविद्यालयीन आणि अभियांत्रिकी विद्यार्थी जात आहेत. त्याशिवाय शहरातील पानटपऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये 'मँगो गोळी' आणि 'मँगो चूर्ण' नावाचा अमली पदार्थ उपलब्ध होत असून याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष झालेले आहे.
उत्तरेकडील राज्यांतून अमली पदार्थ रेल्वेतून आणले जातात. गाडीतील शौचालयात किंवा शौचालयाच्या टाकीच्या भागात असे साठे पद्धतशीरपणे लपवले जात असलायची माहिती पुढे आली आहे. हे पदार्थ पालघर, बोईसर येथील काही ठिकाणी गोदामांमध्ये उतरून नंतर त्यांचे वितरण केले जाते. गांजा, अफू आणि इतर अमली पदार्थाची विक्री कागदाच्या पुड्यांमध्ये २० रुपये ते २५० रुपये दराने पालघर पूर्वेकडील गांधीनगरमधील दुकानांमध्ये राजरोसपणे केली जात आहे. बोईसर येथील काही कामगार वसाहतींमध्येही हे अमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकेच नाही तर पालघर रेल्वे स्थानक आवारातील पडीक इमारतींमध्ये अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले होते. पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत असले तरी अमली पदार्थाच्या विक्रीवर परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.
मँगो गोळी आणि मँगो चूर्ण नावाचे अमली पदार्थ पालघरमध्ये सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. या पदार्थाची वितरण लहान मुलांमार्फत केले जाते, अशी माहिती पुढे आली आहे. हे पदार्थ शहरातील अनेक पानटपऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रेत्यांकडे उपलब्ध होत असून याविरोधात अन्न आणि औषध विभागाने कारवाई करावी, अशी स्थानिक पोलिसांची भूमिका आहे. या दुकानदारांकडून पोलसांची मर्जी राखली जात असल्याचे आरोप होत आहेत.