हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला. हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात होता
.