वसई-विरारमध्ये "मिनरल' च्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री . नागरिकांच्या आरोग्याशी खेळ


वसई, - मिनरल वॉटरच्या नावाखाली दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी विकण्याचा धंदा वसई-विरारमध्ये फोफावला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही अन्न व औषध प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर पालिका प्रशासनाने धडक कारवाई करत बाटलीबंद, दूषित पाणी विकणाऱ्या २६ पोलिसांत गुन्हे दाखल केले.


पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसईविरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत. विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी विकून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलई लाटत आहेत. पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य अशोक शेळके यांनी या गोरखधंद्याची शासनाकडे तक्रार केली होती. यानंतर पालिकेने बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासल्यानंतर पाणी अपायकारक असल्याचे स्पष्ट झाले. यानुसार गेल्या महिन्यात वसई-विरारमध्ये दूषित पाणी विक्री करणाऱ्या ५१ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा २६ व्यावसायिकांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पालिका प्रशासनाने या पाणी कंपन्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसादेखील बजावण्यात आल्या होत्या. तरी या बोगस कंपन्यांनी पालिकेच्या आदेशाला जुमानले नाही.