मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेने घातलेल्या र्निबधांचा फटका सर्वसामान्य खातेदारांना सहन करावा लागत आहे. रिझर्व्ह बँकेने पुढील सहा महिन्यांमध्ये १० हजारांची रक्कम काढण्याची मुभा देत खातेदारांना काहीसा दिलासा दिला असला तरी तोही जखमेवर तात्पुरती मलमपट्टी असल्याची | प्रतिक्रिया सर्वसामान्य खातेदार व्यक्त करत आहेत. निर्बधांमुळे कष्टाचे पैसे गरजेच्या वेळेस काढता येणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. ज्यांचे केवळ पीएमसीमध्येच खाते आहे त्यांना दैनंदिन गरजा भागविण्याकरिता उसनवारी करण्याची वेळ आली आहे.
आयुष्यभर दादर परिसरात घरकाम करून सरूबाई किसन वाघचौरे यांनी १ लाख ५० हजार रुपये पीएमसी बँकेतील बचत खात्यात ठेवले. त्यांचे वय आता ७० वर्षांपेक्षा अधिक आहे. हे पैसे उतारवयात औषधोपचार आणि इतर गरजांकरिता त्यांनी जमवले. त्यांच्या घरी मुलगी आणि त्या अशा दोघीच आहेत. मात्र बँकेतील पैसे काढता येणार नसल्याने भीतीने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. उद्या काही अडचण आली आणि पैसे मिळाले नाहीत, तर आम्ही काय करायचे हा प्रश्न त्या अधिकाऱ्यांना विचारत होत्या. त्यांची समजूत काढताना बँक कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शहरातील बहुतांश भागातील नागरिकांची स्थिती सरूबाई यांच्यासारखीच आहे. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आले असतानाही नागरिक बँकेत चकरा मारत आहेत. त्यांचे पैसे सुरक्षित असून लवकरच ते त्यांना मिळतील, अशा शब्दांत बँकेचे कर्मचारी त्यांना दिलासा देत होते.
जयेशकुमार करोटीया यांचे पगाराचे खाते पीएमसी बँकेत असून त्यामध्ये १ लाख २२ हजार रुपये शिल्लक आहेत. त्यांची काही दिवसांपूर्वी हर्नियाची . शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी सुमारे ३० हजारांचा खर्च आला. नातेवाईक-मित्रांकडून पैसे घेऊन दवाखान्याचा खर्च त्यांनी भागविला. बँकेतील पैशांतून ते हे कर्ज फेडणार होते. मात्र बँकेचे खातेच गोठवण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांचे दुसऱ्या बँकेत खाते नाही. त्यामुळे पैसे असूनही त्यांना पुढील सहा महिने अडचणीत काढावे लागणार आहेत. लोकांचे पैसे कसे द्यायचे आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.