शालेय पोषण आहार योजनेचे मानधन थेट स्वयंपाकीच्या खात्यावर


नामपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधन आता दरमहा दहा तारखेपर्यंत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंपाकी महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो. यासाठी शाळांना निधीही पुरविण्यात येत असतो. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्वयंपाकी, मदतनीस हे शाळांमधून पोषण आहार शिजविणे, आहार । वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये स्वयंपाकी, मदतनीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. स्वयंपाकी महिलांना यापूर्वी दरमहा एक हजार रूपये महिना मानधन अदा केले जात होते. प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या मागणीनुसार वाढत्या महागाईमुळे एप्रिल २०१९ पासून दरमहा १ हजार ५०० रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रकच तयार करून देण्यात आले असून त्याप्रमाणे बँक खात्यात मानधन थेट जमा करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्रप्रमुखांनी दरमहा ३ तारखेपर्यंत मानधनाची देयके तालका कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तालुका कार्यालयाकडून देयकांची तपासणी करून एकत्रित देयके जिल्हा परिषदेस बँक यादीसह सादर करण्यासाठी ५ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत स्वयंपाकी, मदतनीस यांना मानधन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आगाऊ स्वरुपात निधी देण्यात येत असतो. मात्र, तरीही मानधन वेळेवर अदा केले जात नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.