उल्हास नदी प्रदूषणावर २३ मार्चला सुनावणी

कल्याण, दि. २५ (प्रतिनिधी) - कल्याण-डोंबिवली महापालिका सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यात अपयशी ठरल्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबतची सुनावणी २३ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका, जीवन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीची बैठक घेऊन किती मुदतीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करणार याचे सत्य प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या काळात प्रकल्प पूर्ण न झाल्यास अधिकारी आणि ठेकेदार यांना जबाबदार धरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न होता ते थेट उल्हास नदीत सोडले जात असल्यामुळे नदीपात्र मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. प्राधिकरणाविरोधात वनशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय हरित लवाद आणि न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून या दाव्यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कृती आराखडा नको, प्रत्यक्षात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी रखडलेले काम २३ मार्चअखेर पूर्ण करत आयुक्तांनी तसा अहवाल घेऊन न्यायालयात हजर राहावे असे आदेश दिले आहेत.