कोट्यवधी खर्चुन मीरा रोड - करदात्यांच्या पैशांतून कोट्यवधींचा खर्च करून महापालिकेने बांधलेले सिमेंट - काँक्रिटच्या नाल्यांवर बेकायदा वाहन पार्किगचा विळखा कायम आहे. यामुळे कोट्यवधींचे बांधलेले नाले वाहनांच्या भाराने कमकुवत होऊन मोडकळीस आले आहेत. यातून पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होऊन खर्च पाण्यात जाणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेने शहरात लहानमोठे नाले सिमेंट-काँक्रिटचा सँ ब टाकून ते बंदिस्त केले आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. हे बंदिस्त नाले पादचाऱ्यांसाठी चालण्यास मोकळे ठेवणे अपेक्षित आहे. पण, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांच्या सातत्याने चालवलेल्या दुर्लक्षामुळे या बंदिस्त नाल्यांवर बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण झालेले आहे. पालिकेच्या बंदिस्त नाल्यांच्या सॅबवर सर्रास मोठ्या बस, ट्रक, टेम्पो आदी अवजड वाहनांसह चारचाकी गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या अवजड वाहनांमुळे नाल्यांवरील काँक्रिट सॅब आणि ब्लॉक कमकुवत होऊन मोडकळीस आले आहेत. काही ठिकाणी नाल्याचे सॅब व त्यावरील काँक्रिटची झाकणे वाकली आहेत, तर काही ठिकाणी गटारे मोडकळीस तुटली आहेत. त्यामुळे नाले बांधकामासाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च नाल्यात जात आहे. या वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे नाल्यावरील चेंबरची झाकणेसुद्धा तोडण्यात आली आहेत. परंतु, या गंभीर प्रकरणात आजतागायत महापालिका आणि नगरसेवकांनी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिकाच कायम ठेवली आहे. त्यातच या बेकायदा पार्किंगआड गर्दल्ले आणि व्यसनींचा गोतावळा वाढला आहे. महिला-मुलींना याचा मनस्ताप होत आहे. त्यातच, या वाहनांच्या आडोशाला प्रेमीयुगुलांचे चाळे आणि अनैतिक प्रकार चालत असल्याने स्थानिक रहिवासी त्रासले आहेत. बेकायदा वाहन पार्किंगसह नाल्यांच्या सॅबवर चक्क गॅरेज थाटली आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. सर्वात जास्त या सर्वच प्रकारांकडे स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनीही सातत्याने हात झटकण्याची भूमिका घेतली आहे.