मुंबई महानगरपालिकेचा फक्त ४५ टक्के निधीचा वापर


मुंबई- श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महापालिके ने २०१९-२०च्या आर्थिक तरतुदींपैकी केवळ ४५ टक्के निधीच वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ ५५ टक्के निधी वापराविना पडून आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा तरतूद केलेल्या निधीपैकी जास्तीतजास्त निधी खर्च करण्यात पालिकेला यश आले असले, तरी डिसेंबपर्यंत ५० टक्के निधीही खर्च करता आलेला नाही. सागरी किनारा रस्ता, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता यांसारखे प्रकल्प रखडल्यामुळे हा निधी वापरला गेला नाहीच, पण आरोग्य विभागाचाही केवळ ३० टक्के निधी वापरला गेला आहे. केवळ रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्या या विभागांचाच निधी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वापरला गेला आहे. __ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर होणार असून पालिका प्रशासन नवीन अंदाजपत्रक तयार करीत आहे. मात्र डिसेंबपर्यंत केवळ ४५ टक्केनिधीच वापरला गेला असल्याचे वित्त विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दरवर्षी वाढत चाललेल्या अर्थसंकल्पातील फुगवटा कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने २०१७-१८ अर्थसंकल्पाचे आकारमान १२ हजार कोटींनी कमी केले होते. भारंभार आर्थिक तरतुदी केल्यानंतर त्याचा पुरेपूर वापर केला जात नाही आणि अर्थसंकल्पाचे आकारमान वाढत जाते. त्यामुळे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी एका वर्षांत प्रकल्पाला जेवढा निधी लागेल तेवढ्याचीच तरतूद करण्याचा पायंडा पाडला. तीच पद्धत तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र यंदाही विकासकामांचा ४४.४६ टक्केनिधी वापरला गेला. पालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी ३०,६९२.५९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये रस्ते, पूल, आरोग्य, पाणी, विकास नियोजन, घनकचरा, पर्जन्य जलवाहिन्या अशा विभागांतील भांडवली खर्चासाठी ११,४८०.४२ कोटींची तरतूद करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत या अंदाजपत्रकातील भांडवली तरतुदींपैकी केवळ ४४.४६ टक्के निधी वापरला गेला. म्हणजेच भांडवली तरतुदींपैकी ५८६५.६८ कोटींचा निधी खर्च झाला आहे.