दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या ५१ व्यावसायिकांवर गुन्हे


विरार : वसई-विरारमध्ये बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाईची कु-हाड उगारली आहे. नालासोपारा पूर्वेत पाणीविक्रेत्यांकडून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने कारवाई करत ५१ व्यावसायिकांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्यातील नगीनदास पाडा, प्रगती नगर, रेहमत नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा केला जात होता. काही पाणीविक्रेत्यांकडून हा प्रकार मे २०१९पासून सुरू होता. पाणीविक्रेते आपल्या नफ्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळत होते. याप्रकरणी नालासोपारा पालिकेच्या निलेश जाधव यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार तुळींज पोलीस ठाण्यात दुषित पाणीपुरवठा करणाऱ्या ५१ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. नालासोपाऱ्यातील ५१ पाणीविक्रेत्यांकडून दूषित पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे या व्यावसायिकांवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.