मुंबई- आरे वसाहतीतील सुमारे ११४ एकर भूखंडावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या आकर्षक योजना राबविण्याचा विचार करणाऱ्या राज्य शासनाने याच परिसरात सुमारे पाच एकर भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करण्याचे ठरविले आहे. हे मस्त्यालय जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशा रीतीने उभारण्यात येणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पर्यटन महामंडळावरच सोपविण्यात येणार आहे. याबाबतची प्राथमिक योजना तयार करण्यात आली असून त्यासाठी ५०० ते ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आकर्षण ठरावे, या दिशेने प्रयत्न करण्याचे आदेश पर्यटन विभागासोबत झालेल्या पहिल्याच बैठकीत दिले होते. त्यानुसार पर्यटन विभागाने विविध योजना राबविण्याचे ठरविले राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासमोर पर्यटन विभागाने काही योजनांचे सादरीकरणही केले. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मत्स्यालय हा त्याचाच भाग असल्याचे पर्यटन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बँकॉक, जॉजिऱ्या, दुबई, चीन, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन आदी ठिकाणी असलेल्या मस्त्यालयांचा अभ्यास केल्यानंतर प्रामुख्याने बँकॉकमध्ये असलेल्या 'ओशन वर्ल्ड'च्या धर्तीवर मत्स्यालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. फक्त मत्स्यालयच नव्हे तर व्यापारी संकुलासोबत काही आकर्षक धाडसी क्रीडा प्रकारही या ठिकाणी सुरू करण्याचे प्रस्तावित मत्स्यालय करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबईत सध्या तारापोरवाला मत्स्यालय आहे. एकेकाळी आकर्षण असलेले हे मत्स्यालय मरणासन्न अवस्थेत आहे. या मत्स्यालयाचा कायापालट करण्याबरोबर समोरच असलेल्या अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर भूमिगत मत्स्यालय उभारणे हे खर्चीक आहे. त्यापेक्षा अन्य ठिकाणी नवे मत्स्यालय उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सध्या आरे वसाहतीत असलेल्या नैसर्गिक वनसंपत्तीचा यथायोग्य वापर करून पक्षी उद्यान तसेच पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचाही विचार केला जात आहे.
आरे वसाहतीत उभारणार भव्य मत्स्यालय